जळगाव, 9 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राज्यात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होत्या. दरम्यान, यावर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –
जळगावात मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबतची मला कुठलीही कल्पना नव्हती. खडसे हे मोठे नेते आहेत. ते खालच्या लोकांना भेटत नाहीत. त्यांचे कनेक्शन थेट दिल्लीला आहे. यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात माझ्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. दरम्यान, मागे ते सांगत होते की, माझ्या गळ्यात रूमालही टाकला होता आणि त्यावेळी फोटोही काढला होता. यामुळे भाजप प्रवेशबाबत त्यांनीच स्पष्ठ करावे, असे मंत्री महाजन म्हणाले. एकनाथ खडसे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे ते भाजपच्या प्रवेशासाठी माझी कशाला भेट घेतील? खडसे म्हणतात त्याप्रमाणे आमच्यासारख्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांचा भाजप पक्षप्रवेश होणार नाही, असा खोचक टोलाही मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
जामनेरात देवाभाऊ केसरी कुस्तीची दंगल –
जामनेर शहरातील नमो कुस्ती महाकुंभ-2 अंतर्गत 16 फेब्रुवारी रोजी जामनेर येथे देवाभाऊ केसरी कुस्तीची दंगल होणार आहे. या दंगलीत देशातील व देशाबाहेरील 8 ठिकाणचे नामांकित मल्ल उपस्थित राहणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी दिलीय.हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत