संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 5 मार्च : पारोळा शहरातील रहिवासी केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) जवान जितेंद्र देविदास चौधरी यांना श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना वीर मरण आले. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) मधील 102 RAF B/117 बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत होते. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज पारोळा शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र देविदास चौधरी हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) 102 RAF B/117 बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत होते. दरम्यान, कर्तव्यावर असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव श्रीनगर येथून आज पारोळ्यात दाखल झाले. यानंतर पारोळा शहरातील कुटीर रूग्णालयासमोरील स्टेडियमवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारोळ्यात अंतिम निरोपासाठी उसळला जनसागर –
वीर जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे पार्थिव आज पारोळ्यात दाखल झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आले. यावेळी वीर सुपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अत्यंत शोकाकूल वातावरणात जितेंद्र चौधरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, बहिण, दोन लहान मुली असा परिवार आहे.
हेही वाचा : Video : “…..’त्यांना’100 टक्के जेलमध्ये टाकू!”, विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर संतापले