महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव (जळगाव), 6 मार्च : भडगाव तालुक्यातील महिंदळे व पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोंडण या चार गावातील पिण्याचा पाण्याचा तसेच शेती सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी चोरवड व परिसरला लागुन असलेल्या गिरणा कॅनलमधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.
नेमकी बातमी काय? –
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, भडगाव तालुक्यातील महिंदळे व पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोंडण ही गावे कायम स्वरुपी टंचाईग्रस्त असतात. यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न प्रत्येक वर्षी याठिकाणी भेडसावत असतो. या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी गिरणा धरणातून म्हणजेच चोरवड व परिसरला लागुन असलेल्या दक्षिण-उत्तर दिशेने गेलेला गिरणा कॅनलमधून सबकेंनल तयार करून पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.

दरम्यान, नालबंदी गावापासून पाटचारी काढल्यास पळासखेडे, महिंदळे, टिटवी, चोरवड, भोंडण आदी. गावातील 60 ते 70 हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येऊन परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. यामुळे पाणी प्रश्नाशी निगडित तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देऊन सदरचा प्रश्न सोडवावा व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी पिंपरखेड येथील अॅड. विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली.
यावेळी अॅड. विश्वासराव भोसले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना संबंधित भागातील पाणी प्रश्नांची तसेच परिसरात असलेल्या गिरणा नदी याबाबत नकाशाद्वारे माहिती करून दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी देखील अॅड. भोसले यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
हेही वाचा : वीर जवान जितेंद्र चौधरी अनंतात विलीन; पारोळ्यात अंतिम निरोपासाठी उसळला जनसागर