ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 मार्च : 2014 साली पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते आतापर्यंत वर्षातून तीन वेळा पोलीस कवायत मैदानावर येण्याची संधी जनतेच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली. मात्र, या पोलीस कवायत मैदानावर जर पाऊस पडला तर थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात पाणी जाईल, अशी दुर्दैवी अवस्था याठिकाणी पाहायला मिळायची. म्हणजे, वरून कौलांची स्थिती खराब तर खाली घरात पाणी शिरण्याची परिस्थिती या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची होती. म्हणून, 2014 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर पोलीस खात्यातून या विधानसभेचे सदस्यत्व निभावतोय. आणि म्हणून पहिलं काही काम करायचं तर पोलीसांसाठी व्यवस्था करायची, अशी खूनगाठ मनाशी बांधली.
पण, दुर्दैवाने महाराष्ट्राचा आराखडा पाहिला तर सर्वात कमी निधी हा गृहविभाला मिळतो. पण काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात गृहविभागाला एक चांगल्या पद्धतीने निधी दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या कामांसाठी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा येणाऱ्या काळात पुर्णत्वास येतील, असे मला या बजेटवरून वाटत असल्याचे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. पाचोऱ्यातील पोलीस निवासस्थानांसह पोलीस स्टेशनच्या भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, पाचोरा तालुका तसेच शहरासाठी यासोबतच जनतेच्या आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी पाचोऱ्यात पोलिस निवासस्थानांसह पोलिस स्टेशनसाठी 21 करोड रूपयांचा निधी मंजूर केला, म्हणून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुती सरकारमधील सर्व मान्यवरांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आभार मानले.
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, पाचोऱ्यात पोलीस निवासस्थानांसह पोलीस स्टेशनचे येत्या दोन वर्षांच्या कालवाधीत बांधकाम पुर्णत्वास येईल. परंतु, पाचोऱ्यातील आजची पोलिसांची संख्या पाहिली तर 75 आहे आणि येत्या काळात ती संख्या 100 हून अधिक होईल. पण, सध्यास्थितीत क्वाटर्सची संख्या 47 इतकी आहे. म्हणून 50 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी नेमकं जायचं कुठे असा प्रश्न पुन्हा उपस्थित होईल. त्यामुळे चार मजल्यांमध्ये होत असलेल्या इमारतीच्या बांधकामात अधिक एक-दोन मजल्यांचे अथवा इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले तर भविष्याचा देखील प्रश्न सुटू शकतो.
यासोबतच गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी नगरदेवळा, कजगाव, कोळगाव पोलीस स्टेशनची निर्मिती करता येईल का, याकडे देखील पोलीस प्रशानसाने लक्ष देण्याची गरज असून तात्काळ तसा प्रस्ताव तयार करणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले? –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, पाचोरा शहरात पोलीस स्टेशनचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असून यासोबतच 48 पोलीस कर्मचारी, 2 पीआय दर्जाचे अधिकारी तसेच 1 पोलीस उपविभागीय अधिकारी दर्जाचे अधिकारी यांच्या निवास्थानासाठी इमारत बांधण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगकडे जवळपास 350 ते 400 एवढे प्रस्ताव होते. यामध्ये पाचोऱ्याची निवड झाली म्हणून याचे सर्व श्रेय लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांचेच असल्याचेही डॉ. रेड्डी म्हणाले. भडगाव पोलीस स्टेशनच्या नुतनीकरणासाठी देखील आमदारांनी प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुख-सुविधांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील हे आग्रही असतात आणि त्यासंबंधीचा आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात, असे प्रांताधिकारी भूषण अहिरे यावेळी म्हणाले.
पोलीस निरीक्षक अशोक पवार काय म्हणाले? –
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पाचोरा पोलीस स्टेशनसाठी नव्हे तर संपुर्ण पाचोरा शहरासाठी आज अभिमानाची बाब असून पाचोरा शहरात प्रशासकीय इमारत बांधकामाच्या बाबतीत पोलीस खात्याची इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा केला, त्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पोलीस प्रशासनाच्यावतीने मनापासून आभार मानतो.
जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन एसपी दत्तात्रय कराडे यांनी 25 एप्रिल 2018 साली सर्वप्रथम प्रस्ताव पाठवला होता. यानंतर तत्कालीन एसपी दत्ता शिंदे तसेच एसपी पंजाबराव उगले यांनी देखील पाठपुराव केला. यासोबतच एसपी डॉ.महेश्वर रेड्डी यांनी देखील मी पाचोऱ्यात हजर झाल्यापासून वेळोवेळी पाठपुराव घेतला. यासाठी मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो.
10 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व बालकल्याण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे जळगाव येथील स्वामी इन्फ्रास्टक्चर यांना कंत्राट देण्यात आले असून 48 क्वाटर्स आणि एक प्रभारी अधिकारी यांच्यासाठी निवास्थानाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पाचोर पोलीस स्टेशनचे 18 महिन्यात भव्य स्वरूपात बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यान, एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होईल, अशी आशा देखील अशोक पवार यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती –
पाचोऱ्यातील पोलीस निवासस्थानांसह पोलीस स्टेशनच्या भुमिपूजन कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर/पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, डीवायएसपी चंदिले, तहसिलदार विजय बनसोड, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, शिवसेनेचे सुमित सावंत, सुनिल पाटील, किशोर बारावकर, माजी जि.प. सदस्य पदमबापू पाटील, आदी उपस्थित होते.
आमदारांच्या पाठपुराव्याने 21 कोटींचा निधी मंजूर –
पाचोरा शहरातील भडगाव रोड स्थित पोलीस कर्मचारी निवास्थानांची झालेली दुर्दशा पाहता तसेच शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत तब्बल 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे. या कामामुळे दुरावस्था होऊन मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहती मधील निवाऱ्यांपासून त्यांना सुटका मिळणार आहे. यासोबतच, एकच ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थानांचे बांधकाम केले जाणार असून यामुळे पोलीस बांधवांच्या कामात अधिक सुसूत्रता येणार आहे.