मुंबई : अमळनेर मतदारसंघातील मूर्तिकार संघटनेने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडे पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात त्यांनी आमदार अनिल पाटील यांना सविस्तर निवेदन दिले होते. यावर शासन दरबारी योग्य पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी त्यांना दिले होते.
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अनिल पाटील यांनी पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवण्यासंदर्भात सरकारने नव्याने विचार करून तोडगा काढावा, अशी ठाम मागणी केली. याबाबत बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, न्यायालयाने दिलेला निर्णय आणि प्रदूषण बोर्डाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या असतील त्याप्रमाणे तुम्ही हे आजचं उत्तर दिलं. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कशा स्वरुपाचा अहवाल कोर्टाला जो सादर झाला नाही, किवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डालाही कल्पना दिली गेली नाही ती महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने दिली पाहिजे होती. ती आपण देणार का, तसेच जो कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यासाठी फेर याचिका आपण दाखल करणार का, असे आमदार अनिल पाटील यांनी यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले.
यावर मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आताच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाला आम्हाला विनंती केली की, आम्ही जेव्हा हे पुरावे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे देतो, तेव्हा आम्हाला शास्त्रीय पुरावा जोडावा लागेल, त्यासाठी आम्ही ही विनंती केली आहे, आता अदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार जी बैठक झाली, त्यातही लोकांनी सांगितलं की, यामुळे प्रदूषण होत नाही, हे म्हणण्यासाठी जी कागदपत्रे लागतात, जो अभ्यास लागतो, त्याचे पुरावे, वैधता लागते, ते आम्ही जमा करत आहोत. आम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हे सांगण्यासाठी तयार आहोत, आम्ही त्या कागदांची जमवाजमव करत आहोत. त्याचबरोबर जर आवश्यकता भासली, तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही मंत्री पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.