ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 9 मार्च: ज्येष्ठ पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय सरोजिनीताई रविशंकर पांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव हरे परिसर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम 9 मार्च रोजी श्रीमती पी. डी. बडोले माध्यमिक विद्यालय, वरखेडी येथे आयोजित करण्यात आला होता. समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती माता, सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथ गरुड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. सुनीता किशोर (अप्पा) पाटील या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ. भैरवीताई वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी वर्मा, प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ (एम. एम. कॉलेज, पाचोरा), सौ. सविता चंद्रकांत पाटील (सरपंच, वरखेडी), सौ. लताबाई मधुकर काटे (सरपंच, कडे वडगाव) तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्वेता पाटील उपस्थित होत्या.
यावेळी समाजकारण, शिक्षण, आरोग्य, शेती, अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये श्रीमती गंगाबाई महाले, श्रीमती गंगाबाई बाबूलाल कुमावत, कु. चेतना रणदीप हिरे (युवती, वरखेडी), मुख्याध्यापिका पी. एन. पाटील, सौ. सीमा देवराम पाटील, सौ. शुभांगी मनोहर महालपुरे, सौ. नम्रता सागर पाटील, सौ. सुवर्णा अधिकार पाटील (सरपंच), ह.भ.प. श्वेता दुधे (बाल कीर्तनकार), श्रीमती विद्या संभाजी बारी (महिला शेतकरी), मीरा इंद्रचंद परदेशी, उजमा शेख सदेखा अहमद (शिक्षिका), सौ. धनश्री चौधरी (बचत गट), श्रीमती संगीता डुंबळे (नर्स), सौ. शुभांगी सुनील पाटील (अध्यक्ष, आश्रमशाळा सातगाव डोंगरी), सौ. मनीषा गोविंदा शेंडे, सौ. पूजा दिलीप पाटील आणि सौ. रुपाली जितेश पाटील आदींचा समावेश होता.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. सुनीता किशोर (अप्पा) पाटील, सौ. भैरवीताई वाघ, प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. कल्याणी वर्मा, सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्वेता पाटील तसेच मुख्याध्यापिका पी. एन. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाज घडविण्यात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास पत्रकार बांधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.






