सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 13 मार्च : पारोळा शहरातील अत्यंत ज्वलंत व जिव्हाळ्याचा पाणी पुरवठा योजनेचे काम हे गेल्या 1 ते 1.5 वर्षापासुन सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे. यातील तामसवाडी धरण ते पारोळा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत नविन पाईप लाईनचे काम आज पुर्णत्वास आले.
यावेळी एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, शेतकी संघाचे मा.संचालक दासभाऊ पाटील, नगर अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता संकेत कार्ले, दीपक महाजन, सार्थक मोरासकर, संजय गीते हे अधिकारी तसेच प्रगती कन्स्ट्रक्शनचे रंजन महाजन व यश कन्सल्टन्सीचे तुषार शिंपी उपस्थित होते.
तामसवाडी धरण ते पारोळा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या (DI 600 pipeline) नविन पाईप लाईन म्हणजे पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. आज या पाईपलाईनची चाचणी करण्यात आली. कुठलाही अडथळा न येता सुरळीतपणे धरणातील पाणी हे जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले.
दरम्यान, पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेला सुरू करण्यासाठी हे एक मोठे पाऊल पुढे पडले आहे. पाण्यामुळे पारोळा शहरवासियांची होणारी वणवण ही थांबायला आता काही दिवसच अवधी आहे. म्हणुन ही शहरवासियांसाठी मोठी आनंदाची बाब मानली जात आहे.
हेही वाचा : एरंडोलमधील उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश