पाचोरा, 24 मार्च : सुरतच्या एका न्यायालयाने काल गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल दोषी ठरवलं आहे. 2019 मध्ये हा फौजदारी मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या पार्श्वभूमीवर काल पाचोरा येथे प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्यात आहे.
राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर याचा निषेध म्हणून पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्यात आले. देशात एकीकडे शहीद दिवस असतांना दुसरीकडे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. देशात हुकूमशाही सुरू झाली असल्याने विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. अशी टीका यावेळी काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी एका कार्यकर्त्याने प्रतिकात्मक फाशी लावुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, अमजद मौलाना, शंकर सोनवणे, अंबादास राठोड, मधुकर काटे, भगवान वाघ, रमेश गायकवाड, दिपक पाटील, शेख अजिज शेख नबी आदी उपस्थितीत होते.
नेमकं काय आहे प्रकरण –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये हा फौजदारी मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. यामध्ये राहुल गांधी यांना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?’, असे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वायनाडचे लोकसभा सदस्य असलेल्या गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत कथित टिप्पणी केली होती. तर राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार तसंच गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती.