नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर आणि एआय रिसर्चर लेक्स फ्रिडमॅन यांना एक प्रदीर्घ अशी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं आधीचं आयुष्य, हिमालयातील दिवस, आरएसएस, हिंदू राष्ट्रवाद, भारत- पाकिस्तान, यांसारख्या महत्त्वाच्या विषयासोबतच तरुणाईला अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तरुणाईला सल्ला –
यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणाईला सल्ला देताना म्हणाले की, आयुष्यात रात्रीची वेळ आली तरी ती रात्रच असते. पहाट नक्की होते. त्यामुळे आयुष्यात आत्मविश्वास आणि संयम हवा. परमेश्वराने मला कुठल्यातरी कामासाठी पाठवले आहे, हा भाव हवा आणि एकटा नाही, ज्याने मला पाठवलं आहे, तो माझ्यासोबत आहे, हा अतूट विश्वास हवा. कठीण परिस्थितीसुद्धा कसोटीसाठी आहे. अयशस्वी करण्यासाठी नाही. संकटं मला मजबूत करण्यासाठी आहेत. संकटं मला हताश आणि निराश करण्यासाठी नाहीत आणि मी तर प्रत्येक अशा संकटाला नेहमी संधी मानतो.
दुसरी गोष्ट ही की संयम हवा. शॉटकर्ट नाही चालत. आपल्याकडे रेल्वे स्टेशनवर लिहिलेले असते. रेल्वेपुलावरुन जाण्याऐवजी रेल्वे ट्रॅकवरुन काही लोकांना सवय असते. त्याठिकाणी लिहिलेले असते, shortcut will cut you short. त्यामुळे मी तरुणांना सांगेन की, कोणताही शॉटकर्ट नसतो. एक संयम हवा. धैर्य असावे आणि आपल्याला जी काही जबाबदारी मिळते, त्यात आपण जीव टाकून काम करावे. त्याचा आनंद घ्यावा आणि मानवाच्या आयुष्यात हे सर्व आलं, त्याचप्रकारे अनेक गोष्टी आहेत. आयुष्यात वैभवच वैभव आहे. चिंता नाही. तोसुद्धा जर गोधडी घेऊन झोपून राहिला तर तो नष्ट होईल. त्याला वाटले हे सर्व जरी माझ्याकडे असले तरी मला माझ्या सामर्थ्यामध्ये वाढ करायला हवी. मला माझ्या ताकदीनुसार, समाजाला द्यायला हवे. माझी परिस्थिती चांगली असेल तरी माझ्याकडे करण्यासाठी खूप काही आहे. चांगली स्थिती नसेल तरी करण्यासाठी खूप काम आहे, हे मी तरुणाईला सांगू इच्छितो.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दुसरं मी पाहिलं की, काही लोक, चला यार आता झालं, इतकं शिकलो खूप झालं. पण आयुष्यात आपल्या आतील विद्यार्थ्याला कधीही संपू देऊ नये. सातत्याने शिकत राहायला हवे. आता गुजराती माझी मातृभाषा आहे. मला हिंदी भाषा येत नव्हती. वाक्चातुर्य काय असते, कसं बोलावं, हे माहिती नव्हते. त्यावेळी वडिलांसोबत चहाच्या दुकानावर बसायचो, तर इतक्या लहान आयुष्यात इतक्या लोकांना भेटण्याची संधी मिळत होती आणि मला प्रत्येक वेळी त्यातून काही ना काही शिकण्याची संधी मिळायची. त्यांची बोलण्याची पद्धत या सर्व गोष्टींवरुन मी शिकत होतो. आज आपली स्थिती नाही, पण कधी होईल तेव्हा आपण असं का करू नये. आपण या पद्धतीने का राहू नये. त्यामुळे शिकण्याची वृत्ती ही आपल्यामध्ये नेहमी राहायला हवी, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला दिला.
मी पाहिले की बहुतांश लोकांना, काही मिळवायचं, काहीतरी बनायचं, मनात एक स्वप्न, लक्ष्य असते आणि ते जेव्हा होत नाही, तेव्हा ते निराश होतात. त्यामुळे मला जेव्हा माझ्या मित्रांशी बोलण्याशी संधी मिळते तेव्हा मी त्यांना सांगतो की, पहा काहीतरी मिळवायचं, बनायचं या स्वप्नांऐवजी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहा. जेव्हा काहीतरी करण्याचं स्वप्न पाहतात, समजा तुम्ही 10 पर्यंत करायचं ठरवलं आणि 8 पर्यंत पोहोचलात. तेव्हा तुम्ही निराश होणार नाहीत. तुम्ही 10 साठी मेहनत कराल. मात्र, तुम्ही काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि नाही झालं तर जे झालं आहे, तेसुद्धा तुम्हाला ओझं लागेल. त्यामुळे आयुष्यात नेहमी प्रयत्न करायला हवे. आणि काय मिळालं, काय नाही मिळालं यापेक्षा मी काय देऊ शकतो, मनात हा भाव हवा. समाधान जे आहे, ते आपण काय दिलं, यातून येते, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला दिला.
हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?