मुंबई, 23 मार्च : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडल्यानंतर आता 2027 साली नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात नियोजन केले जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करून नाशिक कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा केली. तसेच पाणी स्वच्छतेसाठी 1200 कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत “सिंहस्थ कुंभमेळा – 2027” आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भूसे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातील आराखड्याचे प्रशासनाकडून प्रेझेंटेशन घेत माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासनाकडून आढावा घेतला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या बाबींबाबत माहिती दिली. तसेच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार असल्याचे यावेळी घोषित केले.
कुंभमेळ्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये 11 पुल बांधत आहोत. रस्त्यांचे मोठे जाळ तयार करत आहोत. तसेच घाट वाढवत असून सोयीसुविधा वाढवणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभ मेळ्याआधी सर्व काम पूर्ण करण्याची योजना आहे. दरम्यान, या सगळ्या विकासकामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून राज्य सरकार म्हणून मी, एकनाथ शिंदे तसेच अजितदादा आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि यासाठी कुठल्याही निधीच कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.
त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन –
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दर्शन घेतले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे तसेच सीमा हिरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.