मुंबई, 24 मार्च : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या शोदरम्यान एक कविता ऐकवली, त्यात त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, या गाण्यावरून मोठा वाद पेटला असून कुणाल कामराने माफी मागवी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराचं समर्थन करत कुणाल कामरा हे जे बोलला ती जनभावना असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
विधानभवन परिसरात माध्यमांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर हल्ला वैगेरे हे सत्य नाही. सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवरील हल्ला होऊ शकत नाही. हे सत्य आहे. आम्ही तर उघडपणे बोलतो की, हे गद्दार आहेत. त्यामुळे यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले कुठे? तिथे त्यांनी उघड-उघडपणे चोरी केलीय. त्यामध्ये पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं या राज्यात काही चालत नाही. आम्ही वाटेल ते करू शकतो, असं दाखविण्याचा यांचा हा प्रयत्न वेळीच चिरडून टाकला पाहिजे.
उद्धव ठाकरेंकडून कुणाल कामराचं समर्थन –
गद्दारांना गद्दार म्हणणं याबाबत कोणावर हल्ला करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. खरंतर, जे गद्दार आहेत ते गद्दारच आहेत, मला वाटत नाही की, कुणाल कामरानं काही चुकीचं म्हटलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर हल्ला झालं हे म्हणणे गैर नसून मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे, अशा शब्दात कुणाल कामराचं उद्धव ठाकरेंनी समर्थन केलंय. दरम्यान, कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेला डिवचले. शिवसेनेने ही तोडफोड केली नसून गद्दार सेनेने ही तोडफोड केली असल्याचे ते म्हणाले.
ठाकरेंचा सरकारला सवाल –
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं की गद्दारांचा, अनाजी पंतांचा वारसा पुढे चालवयाचा की संभाजी महाराजांचा, असा सवाल उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केलाय. दरम्यान, राज्यात गद्दारांचं उदात्तीकरण जर देवेंद्र फडणवीसांना मान्य असेल तर देव सुद्धा त्यांचं पद वाचवू शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले आहेत.
नेमकं काय प्रकरण? –
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन असून विविध ठिकाणी त्याचे शो आयोजित केले जातात. अशातच ठाण्यातील एका हॉटेलात त्यांचा शो पार पडला असता, या शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. यामुळे कुणाल कामरा हा पुन्हा एकदा वादात आलाय. तर त्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत त्याच्या स्टुडिओची तोडफोड केलीय. तर दुसरीकडे पोलिसांनी कुणाल कामरावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, कुणाल कामराच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांकडून माफीची मागणी केली जात असताना उद्धव ठाकरेंकडून कुणाल कामराचं समर्थन करण्यात आल्याने राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.