अमळनेर, 3 एप्रिल : अमळनेर तालुक्यातील सात्री गावातून मोठी बातमी समोर आली आहे. सात्रीत एका खळ्याला अचानक आग लागली आणि ती आग पसरली. दरम्यान, त्यात एका घरातील चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याने सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची भयानक घटना काल 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सात्री या गावात एका खळ्याला अचानक आग लागली. यावेळी खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलिंडर होते. दरम्यान, खळ्यात लागलेली आग त्या घरापर्यंत पोहोचली. यामुळे एकापाठोपाठ एक करून सिलिंडरचा स्फोट झाला. सात्रीतील भयानक आगीमुळे जवळपास सात ते आठ घरे जळून खाक झाली असून अचानक लागलेल्या आगीमुळे संपुर्ण गाव हादरून गेल्याचे पाहायला मिळाले.
अग्निशमन दलाचे बचावकार्य –
सात्रीत आगीबाबत माहिती मिळताच अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. काही वेळाने धरणगाव, चोपडा तसेच पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने बचावकार्यासाठी त्याठिकाणी पोहचली. दरम्यान, प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी घटनेबाबत आढावा घेतलाय.