जळगाव, 13 एप्रिल : विधानसभा निवडणुकीतील हवाच वेगळी होती. मलाही वाटायचं की माझं काही खरं नाही. अनेक जण म्हणायचे की आता हा येतच नाही; हा गेला म्हणे डब्यात. पण लोकांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य देत निवडून दिले. खरंतर, महायुती ज्यापद्धतीने घट्ट होती..त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ममुराबाद-विदगाव-किनगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी देखील मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले. जरी ती बहिण काँग्रेसची होती. 1500 कडे पाहून तिने बरोबर आम्हाला मते दिली. जरी तिला नवऱ्याने सांगितले तरी जो 1500 देईल तो आपला भाऊ, अशापद्धतीने मतांची टक्केवारी जर पाहिली तर महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मताधिक्य दिले. खरंतर, महायुतीने देखील महिलांसाठी बसमध्ये 50 टक्के सवलत, लाडकी बहिण योजना, लखपती दिदी, महिला सक्षमीकरण अशा योजना राबविल्यामुळे महिलांचा कल आमच्याकडे राहिला.
दरम्यान, जळगाव ग्रामीण किंवा चोपडाच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील 11 चा जागा तसेच दोघंही खासदार यासोबतच केंद्रात एक राज्यमंत्रीपद तसेच राज्यात 3 कॅबीनेटमंत्री असे एकाचवेळी चार मंत्रीपदे मिळाले. एवढं आपल्या जळगाव जिल्ह्याला मागच्या काळात कोणीच दिलं नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले? –
मला मंत्रीपद मिळेल की नाही, याबाबत मला देखील शाश्वती नव्हती. कारण, वाटा पाडणारे तीन आणि निवडून आलेले 237. मागच्या वेळेस सव्वा चार आमदारांमागे एक मंत्री होता आणि यावेळेस सव्वा सात आमदारांमागे एक मंत्री अशी स्पर्धा होती. मात्र, ‘कुछ भी हो जाओ; पण गुलाबराव पाटील मंत्री झाले पाहिजे’ अशापद्धतीने सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले, असे गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाबाबत सांगितले.
ममुराबाद-विदगाव-किनगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे रस्ते केवळ वाहतुकीचे साधन नसून गावाचा आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहेत. “रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी असून, हे रस्ते स्थानिक जनतेसाठी वरदान ठरणार आहेत. ते विकासाच्या नव्या युगाची नांदी ठरतील.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, असा स्पष्ट इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.






