श्रीनगर, 23 एप्रिल : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतावाद्यांच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असताना राज्य सरकारने तातडीने पावले उचलत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगर याठिकाणी पाठवण्यात आलंय. दरम्यान, ते आज सायंकाळी श्रीनगर विमानतळावर पोहचले आणि त्यांनी उपस्थित राज्यातील नागरिकांची विचारपूस केली.
महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था –
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील जवळपास 28 नागरिक मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातीलही 6 नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार या सर्व मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा संपूर्ण खर्च महायुती सरकारतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय.
गिरीश महाजन तातडीने काश्मीरमध्ये दाखल –
गिरीश महाजन हे आज सायंकाळी श्रीनगर विमानतळावर पोहचले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने पर्यटकांना धीर देण्यासाठी, सहाय्यता करण्यासाठी, त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आज सायंकाळी श्रीनगर येथे पोहोचले. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत संवाद साधत त्यांनी धीर दिला.
लोकांमध्ये भीतीचं वातावरण हे नाकारता येणार नाही. पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात अलर्ट झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. एकीकडे अनेकांना घरी जाण्याची काळजी लागली असताना जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.