अमळनेर, 13 मे : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अमळनेर तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वडिलांच्या दूध विक्रीच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या लेकीवर काळाने झडप घातली आहे. भाग्यश्री दीपक पाटील (रा.जानवे ता. अमळनेर) असे मयत मुलीचे नाव असून अमळनेर धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीच्या वडिलांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायात भाग्यश्री तिच्या वडिलांना मदत करायची. ती नेहमी मोटरसायकल ला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेरपर्यंत यायची. अशातच ती नेहमीप्रमाणे मोटारसायकलला दूधाची कॅन बांधून अमळनेरकडे दूध विक्रीसाठी निघाली असताना 12 मे रोजी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे तिची मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. यावेळी भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता.
दरम्यान, याबाबतची माहिती गावातील लोकांनी मिळाल्यावर त्यांनी तिला उचलून दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘वडिलांचा झाला होता अपघात अन्…..’
भाग्यश्रीच्या वडिलांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. अमळनेरातील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण करत वडिलांच्या दूध विक्रीच्या व्यवसायात भाग्यश्री मदत करत असे. तिचे वडिल दीपक पाटील यांचा काही महिन्यांपुर्वी अपघात झाला होता. दरम्यान, वडिलांचा दूध विक्राची व्यवसाय नित्यनेमाने चालवा म्हणून गेल्या तीन-चार महिन्यांपासून ती मोटारसायकलला दूधाची कॅन बांधून जानव्याहून कधी अमळनेर तर कधी धुळ्याकडे जात असे. अशातच वडिलांच्या दूध विक्रीच्या व्यवसायात हातभार लावणाऱ्या ‘भाग्यश्री’वर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.