ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 15 मे : पाचोरा तालुक्यातील माहिजी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहिजी येथील 22 वर्षीय तरूणाचा गिरणा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज 15 मे रोजी दुपारी 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडली. आकाश राजेश यादव (वय 22) असे मयत तरूणाचे नाव असून सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या गोठ्यातील म्हशींना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीवर घेऊन गेला होता. म्हशी नदीच्या पात्रात पाणी पित असताना आकाशचा गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याचा डोहात तोल गेला. यावेळी डोहाचा अंदाज न आल्याने तो नदीच्या पात्रात बुडाला.
“…मुलगा घरी न परतल्याने आईचा आक्रोश!” –
दरम्यान, पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशी गोठ्यात परतल्या. मात्र, आपला भाऊ घरी न परतल्याने ज्ञानेश्वर यादव याने त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. याचवेळी म्हशी गोठ्यात परतल्या पण मुलगा घरी न आल्याने आकाशच्या आईने एकच आक्रोश केला. दरम्यान, गावचे पोलीस पाटील राजू पाटील यांना याबाबतची माहिती मिळाली.
तरूणाचा नदीत घेतला शोध –
यानंतर पोलीस पाटील तसेच आकाशची आई व भाऊ तसेच ग्रामस्थांनी गिरणा नदी गाठली. यावेळी पोलीस पाटील यांच्या सांगण्यावरून नावच्या (बोट) साहाय्याने गिरणा नदीत बुडालेल्या आकाशचा शोध घेण्यात आला. तसेच गावातील पोहणाऱ्या दहा ते अकरा जणांना नदीत साखळी पद्धतीने शोध घेतला.
दरम्यान, एक दीड तासानंतर आकाशचा मृतदेह शोधण्यास यश आले. यानंतर आकाशचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात हलिवण्यात आला. आकाशवर उद्या सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार पार पडणार असून त्याच्या पश्चात आई-वडिल आणि भाऊ असा परिवार आहे. आकाशच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.