जळगाव, 17 मे : भाजपचे जेष्ठ नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यात नेहमीच वाकयुद्ध सुरू असतं. अशातच एकनाथ खडसेंनी मंत्री महाजन यांच्यावर पालकमंत्रीपदाबाबत टीका केली होती. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना आव्हान दिलं आहे. (girish mahajan on eknath khadse)
एकनाथ खडसे काय म्हणाले होते? –
गेल्या चार दिवसांपुर्वी पत्रकारांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सूटलेला नाही. तरी काही मंत्री हे मला पालकमंत्री पद द्या, मला पालकमंत्रीपद द्या, असे लाचारपणे व लोचटपणे मागणी करत आहेत. या मागणीला लाचारपणाच म्हणावे लागेल आणि काही कारणासाठी पालकमंत्रीपदाची मागणी ते करत आहेत.
दरम्यान, स्वाभिमानाने पालकमंत्री झालं पाहिजे. मात्र, ‘नाही हो पालकमंत्री मला करा, मला सांभाळा, मला पालकमंत्री करा, असे सांगणे ही लाचारीच आहे, असे म्हणत खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
मंत्री गिरीश महाजन यांचं खडसेंना नेमकं आव्हान काय? –
मंत्री गिरीश महाजन यांना एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आले. एकनाथ खडसे हे दोन-दोन वेळा विधानसभा निवडणुकीत ते पडत आहेत. त्यांच्या गावाची ग्रामपंचायत तसेच बोदवडची नगरपालिका त्यांच्याकडे नाहीये. त्यांनी माझी काळजी करू नये. मी आहे त्या ठिकाणी योग्य आहे. यामुळे एकनाथ खडसेंनी कोथळी ही त्यांची ग्रामपंचायत निवडून आणावी. त्यांनी बोदवडधील नगरपालिका किंवा एखादी ग्रामपंचायत निवडून आणावी, असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे.
हेही वाचा : पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?