नवी दिल्ली, 17 मे : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील केळी क्लस्टर संदर्भात “गॅप अॅसेसमेंट रिपोर्ट” (Cluster Gap Assessment Report) वर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी तज्ज्ञ, शेतकरी प्रतिनिधी व प्रक्रिया उद्योगांशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.
जळगावमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व निर्यातक्षम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या अभावाची केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी गंभीर दखल घेत, संबंधित विभागाने केळी क्लस्टर गॅप मूल्यांकन अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे क्लस्टरनिहाय गरजांची अचूक नोंद घेऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी Request for Proposal (RFP) लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
अहवालानुसार, उत्पादन टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञान तसेच प्रक्रिया व वाहतूक व्यवस्थेत कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग-पॅकिंग युनिट्स, रायपनिंग चेंबर्स आणि किफायतशीर वाहतुकीची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. निर्यातीसाठी आवश्यक असलेली जागतिक गुणवत्ता मानके पूर्ण करण्यात आव्हाने चिन्हीत करण्यात आलेली असून, शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवणे गरजेचे आहे.
तसेच या बैठकीमध्ये केळी उत्पादन, प्रक्रिया व निर्यातीमध्ये उद्भवणाऱ्या अनेक अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली. उत्पादन टप्प्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, सिंचन व खत व्यवस्थापनातील अपुऱ्या सुविधा आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव या मुख्य अडचणींवर निरसन करण्यासाठी भर देण्यात आला. प्रक्रिया व वाहतूक व्यवस्थेत कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग-पॅकिंग युनिट्स, रायपनिंग चेंबर्सची कमतरता आणि केळी प्रक्रिया उद्योगांची मर्यादित उपस्थिती यामुळे होणारे नुकसान कशाप्रकारे टाळता येईल यावर भर देण्यात आला.
तसेच जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक गुणवत्ता मानके पाळण्यात अडचणी दूर करणे आणि शेतकऱ्यांचा थेट निर्यात प्रक्रियेत मर्यादित सहभाग वाढविणे प्रस्तावित आहे.