जळगाव, 24 मे : महाराष्ट्रातील विविध भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर असतानाच मान्सूनच्या आगमनाची माहिती समोर आली आहे. पुढील 48 तासांत नैर्ऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवसांत कोकण व गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
मान्सून केरळमध्ये होणार दाखल –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत नैर्ऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे. यासोबतच अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
राज्यात पुढील 24 तासांसाठी विविध भागांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामांना वेग आलाय. असे असताना जळगाव जिल्ह्यात आज 24 मे रोजी ढगाळ वातावरण राहणार असून विविध भागात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य देणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?