चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 27 मे : गेल्या अनेक महिन्यांपासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपात जाणार असल्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. दरम्यान, आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून दिलीप वाघ यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानसपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पद्रे महामंत्री विजय चौधरी, जळगाव पश्चिमचे अध्यक्ष राधेश्याम चौधरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधू काटे, तसेच भाजपचे नंदु सोमवंशी, प्रदीप पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दिलीप वाघ भाजपमध्ये दाखल –
माजी आमदार दिलीप वाघ यांनी मुंबईत जाऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची भूमिका जाहीर केली होती. दरम्यान, आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, माजी पंचायत समिती सदस्य ललित वाघ यांच्यासह, शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, उबाठा गटाचे शहर प्रमुख सोमनाथ देशमुख, अभिमन्यू पाटील, राजेंद्र पाटील, भागवत महालपुरे, रणजित अभिमन्यू पाटील, सूचिता वाघ, ज्योती वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय.
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश –
राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आगामी चार-पाच महिन्यांतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच दिलीप वाघ भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे वाघ यांचा ह्या प्रवेशाने कुठले नवे समीकरण जुळणार, याची देखील उत्सुकता आता मतदारसंघाला लागलीय.
अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती 2024 ची विधानसभा निवडणूक –
दिलीप वाघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते मानले जात होते. मात्र, 2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर ते काही काळ अजित पवार यांच्या गटात होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी असल्याचे म्हटलं होतं. असं असताना त्यांना महाविकास आघाडीत पाचोरा-भडगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला आला. यानंतर दिलीप वाघ यांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरायचा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका –
विधानसभा 2024 च्या निवडणुकीत दिलीप वाघ यांनी अपक्ष उमदेवार म्हणून निवडणूक लढवली आणि प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आणि त्याच दिवसापासून दिलीप वाघ यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील दिलीप वाघ यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्विकारत भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रह धरला. अखेर, आज 27 मे रोजी दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
View this post on Instagram
राष्ट्रवादीचा बुरुज ढासळला? –
पाचोरा-भडगाव मतदारसंघात वाघ घराण्याचा अगदी 1957 सालापासून राजकारणात सक्रिय सहभाग राहिलाय. दिलीप वाघ यांचे वडिल स्व. ओंकार नारायण वाघ यांनी देखील पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नेतृत्व केलं होते. यानंतर दिलीप वाघ यांनी 2004 साली पहिल्यांदाच तत्कालीन आमदार स्व. आर. ओ. पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, 2009 साली त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि तत्कालीन आमदार स्व. आर. ओ. पाटील यांना पराभूत करत पहिल्यांदा आमदार म्हणून विजय मिळवला. यानंतर 2014,2019 आणि 2024 अशा सलग तीन निवडणुक लढवल्या. मात्र, तिन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला.
View this post on Instagram
पाचोरा-भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे वाघ घराणे आणि वाघ घराणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असंच काहीसं समीकरण मागील अनेक वर्षांपासून होतं. दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघात 2004 सालापासून ते 2019 सालापर्यंत सलग चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केलेल्या दिलीप वाघ यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पाचोरा-भडगावमध्ये राष्ट्रवादीचा बुरुज ढासळला का? असा सवाल उपस्थित झालाय.