मुंबई, 29 मे : विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या असताना देखील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आणि त्यांनी भाजपला दगा दिला. यामुळे आम्हाला दुसरा पर्याय शोधावा लागला आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.
संजय राऊत काय म्हणाले? –
आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जसं म्हणत आहेत की, उद्धव ठाकरेंनी दगा दिला. मात्र, हे पुर्णपणे चूक असून आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्यांनीच चर्चेचे दरवाजे बंद केले. आमच्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या हे खरंय पण आमच्या जागा त्यांनी पाडल्या.
सत्तेच्या समानवाटपाचा भाजपने दिला होता शब्द –
सत्तेचे वाटप समसमान होईल, हा त्यांचा शब्द होता. याबाबतचे भाष्य देवेंद्र फडणवीस तसेच अमित शहा यांनी वरळीत हॉटेल ब्लू सी ला केलेले होते. खरंतर, सत्तेचे वाटप समसमान होईल याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्राला समजवून सांगितला पाहिजे. सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असे त्यांनी तिथे सांगितले होता का. मुख्यमंत्रीपद काय धर्मदाय पद नाहीये ना. यामुळे सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहे.
‘…अन् आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री’ –
तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना कसे दिले. तुम्हाला शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते. पण शिवसेनेतून फुटलेल्या गटाला तुम्ही मुख्यमंत्री पद दिले. आमच्या धोरणात बसत नाही असे सांगत तेव्हा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतात. आज तुमच्याकडे दोन-दोन उपमुख्यमंत्री असून भुजबळांच्या नावाचा देखील उपमुख्यमंत्रीपदासाठी विचार सुरू आहे, हे तुम्हाला चालतं का, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला केला.
View this post on Instagram
तुम्ही शिवसेनेला दगा देण्याच्या विचारानेच त्यावेळी राजकारण करत होते. शिवसेनेला दगा देऊन शिवसेनेचे तुकडे करायचे यासाठीच भाजपची रणनिती तसेच आखणी तेव्हापासूनच सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललीय हे जरी खरं असलं तरी येणारा काळ ठरवेल की, ही दिशा चुकीची होती की बरोबरची होती. यासोबतच भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक हे महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिसत असतील मात्र ते उद्या असतीलच याची खात्री नाही, असा टोला संजय राऊत यांनी लावलाय.
हेही वाचा : आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल