चंद्रकांत दुसाने/ईसा तडवी
पाचोरा, 31 मे : शेती आणि शेती करणाऱ्या तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी तसेच शेतीत तरूणांचा सहभाग वाढावा यासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून “युवा शेतकरी मॉडेल” या अनोख्या आणि अत्यंत कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ पाचोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने राजुरी येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांच्या शेतातून युवा शेतकरी संवाद मेळावाच्या माध्यमातून 30 मे रोजी करण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संचालक राहुल पाटील, विजय पाटील, मार्केट कमिटीचे सचिव बी.बी. बोरूडे, प्रविण ब्राम्हणे, रवि गिते, इंदल परदेशी, शालीग्राम मालकर, विनोद तावडे, राजेंद्र पाटील तसेच प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील, मुयर वाघ, स्वप्निल महाजन, समाधान मालकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
युवा शेतकरी संवाद मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, आधी सांगतलं जातं होतं की, शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, विहिरीत पाणी नाही तसेच शेतात वीज नाही यामुळे शेतकरी हतबल आहे. पण मागील दहा वर्षांच्या तुलनेत हे सर्व उपलब्ध झाले असूनही आमचा युवक शेतकरी हा शेतीकडे का वळत नाही, हा प्रश्न अनेक दिवसांपासून माझ्यासमोर उपस्थित होत होता.
युवा शेतकरी मॉडेल –
म्हणून ‘तुझं आहे तुझपाशी, परी जागा तू भूललासी’ याप्रमाणे दहा-वीस हजार रुपयांच्या नोकरीसाठी दिशाहीन झालेल्या युवकांना शेतीकडे वळवता येईल का यासाठी मी प्रयत्न करतोय. या पार्श्वभूमीवर तालुक्यात असलेल्या प्रगतशील युवा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन दिशाहीन झालेल्या तरूण शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आजपासून ‘युवा शेतकरी मॉडेल’ हा उपक्रम सुरू करतोय. यामध्ये 100 ते 200 तरूण शेतकऱ्यांना बोलवून त्यांच्याशी शेतीशी निगडित गप्पा-चर्चा करण्याचा उद्देश्य असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
गावागावापर्यंत शेतीसंदर्भातील मार्गदर्शन पोहचवणार –
पाचोरा-भडगाव तालुक्यात विविध ठिकाणी युवा शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरूण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्य सरकारने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून वर्षांतून चार वेळा प्रत्येक जिल्हा परिषद गटात पीडित असलेल्या सगळ्या लोकांना प्रत्येक गोष्ट पोहचविण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याप्रमाणे आम्हाला आमच्या गावापर्यंत शेती आणि शेतीचे मार्गदर्शन कसे पोहोचवता येईल. तसेच दिशाहीन झालेल्या तरूणांना शेतीकडे कसे वळवता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
युवा प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा –
आपली स्वतःची 50 एकर शेती सोडून फक्त लग्नासाठी मुंबई-पुण्याला जाणारा तरूण 15-20 हजार रूपयांची नोकरी करतोय. कालांतराने लग्न झाल्यानंतर शहरात 15-20 हजार रूपयांत परवडत नाही म्हणून घरी येतो आणि त्यानंतर भांडणे सुरू होतात. केवळ लग्नासाठीच आम्ही आमचं शिकलेलं मुलगा शहरात पाठवतोय आणि मजूराकडून शेती करून घेतोय तर शेतकऱ्याची कशी प्रगती होऊ शकते, असा सवाल करत त्याआधीच लग्न जमावण्याठी जे सत्य आहे तेच सांगितलं आणि जर तालुक्यातील युवा प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर सुंदर पद्धतीची शेती हे तरूण करू शकतात, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील, मयुर वाघ, स्वप्निल महाजन, समाधान मालकर यांच्याकडून ज्यापद्धतीने शेती केली जातेय त्याचे कौतुक करत आजच्या तरूण शेतकऱ्यांसाठी या प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
तरूणांचा शेतीत सहभाग वाढविण्यासाठी उपक्रम –
10 ते 50 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा पोरगा केवळ नोकरीसाठी वणवण करून शहरात जातोय. अशा दिशाहीन झालेल्या तरूणांना एकत्रित करून शेतीकडे कसे वळवता येईल, यासाठी युवा शेतकरी संवाद मेळाव्याला सुरूवात केली असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. दरम्यान, तालुक्यातील प्रगतशील युवा शेतकऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले तर त्यातून प्रेरित होऊन निश्चितपणे पाचोरा-भडगाव तालुक्यातील तरूण शेतकरी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आणि यामाध्यमातून आगामी काळात शेतकऱ्यांना विविध विषयांवरचे मार्गदर्शन मिळणार आहे. पिंपळगाव शिंदाड गटातून आज मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्यात होतोय याचे देखील कौतुक वाटते. केंद्र तसेच राज्य सरकार यांच्यातर्फे कृषी क्षेत्राशी निगडित जे काही विषय असतील ते विषय सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या युवा शेतकरी अभियानाबाबत माहिती देत आजच्या स्थितीत तरूण शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शेतीशी निगडित विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या प्रती आपण काही देणं लागतो..त्याची परतफेड केली पाहिजे तसेच युवकांचा शेतीत सहभाग वाढवून त्यांच्या हातून नवनिर्मीती झाली पाहिजे, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन पोहचविण्याचे पुर्तता युवा शेतकरी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होत असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूचत्रसंचालन शिवसेनेचे भिमशक्ती-शिवशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रविण ब्राम्हणे यांनी तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी मानले.
तरूण प्रगतशील शेतकऱ्यांनी केले मागर्दर्शन –
पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील प्रगतशील शेतकरी मयुर वाघ यांनी त्यांच्या शेतीपद्धतीबद्दल माहिती देत आतपर्यंतचे शेतीकामांबाबतचे अनुभवकथन केले. तसेच पहाण येथील युवा शेतकरी स्वप्निल महाजन हे शेतीसोबत शेतीपूरक मुरघासचा व्यवसाय करत असून याबाबतची त्यांनी माहिती दिली. यासोबतच दत्तात्रय मालकर या प्रगतशील तरूण शेतकऱ्यांनी आंबाच्या माध्यमातून कशापद्धतीने उत्पन्न घेतले याबाबता माहिती दिली.
तालुका कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान –
पाचोरा तालुका येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रमेश जाधव यांची पदोन्नती झाली असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) याठिकाणी ते जात आहेत. या पार्श्वभूमीवर रमेश जाधव यांनी पाचोरा तालुक्यात केलेल्या कामगिरीबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.