हातगाव (चाळीसगाव), 3 मे : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून हादरवणारी समोर आली आहे. हातगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल 2 मे रोजी उघडकीस आली. विजय सुकदेव चव्हाणके (वय 45) असे मयत पतीचे तर वर्षा चव्हाणके (वय 40) असे मयत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पती विजय चव्हाणके विरोधात चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, विजय सुकदेव चव्हाणके हा त्याच्या पत्नी, मुले तसेच आईसह हातगाव शिवारातील शेतात राहत होता. गेल्या दोन वर्षांपुर्वी त्याचा अपघात झाला आणि तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. यामुळे त्याचा पत्नीसोबत नेहमीच वाद होत असे. असे असताना तो पत्नी वर्षा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
…अन् भावाला फोन करून दिली पत्नीच्या खूनाची माहिती –
मृत विजय चव्हाणके याचा भाऊ अशोक यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय चव्हाणके याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. यानंतर विजयने भाऊ अशोक यांना फोन करत आपण पत्नी वर्षाला संपविले असून स्वतः देखील जीवाचे बरेवाईट करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यानंतर अशोक चव्हाणके यांनी भाऊ विजय तसेच त्याची पत्नी वर्षा हिचा शोध घेण्यासाठी शेतात धाव घेतली. यावेळी शेतात असल्यास आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला.
पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून केला पंचानामा –
हातगाव शिवारात पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक शेवाळे, राहुल प्रदीप राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच तपासाच्या दृष्टीने फॉरेन्सिक टीमदेखील दाखल झाली. दरम्यान, या घटनांचा पंचनामे करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले.
हेही वाचा : Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कुठे मिळाली नियुक्ती?