अहमदाबाद, 13 जून : अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी टेकऑफ केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अवघ्या काही क्षणातच काल गुरूवारी 12 जून रोजी दुपारी दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात जवळपास विमानातील एका प्रवाशाला वगळता सर्वच प्रवासी मृत्यूमुखी पडले. या विमान अपघाताच्या घटनेने संपुर्ण देश सुन्न झालाय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये विमान अपघातानंतर भेट दिली.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबाद दौरा –
अहमदाबाद येथे विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली. ज्यामध्ये प्रवासी, केबिन क्रू आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील डॉक्टरांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जवळपास 265 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक जण बचावला असून सीट नंबर 11 ए वर बसलेल्या विश्वासकुमार रमेश असे त्याचे नाव आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान अपघाताच्या घटनेनंतर आज अहमदबादचा दौरा केला असून या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे….
1. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची केली पाहणी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे दाखल झाल्यानंतर विमान अपघात स्थळाची पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी जवळपास 20 मिनिटे ही पाहणी केली. विमान अपघाताची घटना कशी घडली तसेच बचाव कार्य तसेच जखमींना कशापद्धतीने बाहेर काढण्यात आले याबाबतची माहिती पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
2. पंतप्रधान मोदींनी रूग्णालयात जखमींची केली विचारपूस –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदबाद येथील सरकारी रूग्णालयात जाऊन विमान अपघातात जखमी झालेल्या रूग्णांची विचारपूस केली. यावेळी जखमी रूग्णांना धीर देत सरकार सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. दरम्यान, विमान अपघातात बचावलेला एकमेव प्रवासी म्हणजे विश्वासकुमार रमेश याची देखील नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्याच्यासोबत संवाद साधला. यावेळी जखमींसोबत वेळ घालवल्यानंतर तसेच चालू उपचारांचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान रुग्णालयाबाहेर पडले.
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक –
एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये नागरी विमान वाहतूक विभागाच्या कार्यालयात केंद्र सरकारमधील मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. तसेच विमान अपघाताची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी महत्वपुर्ण सूचना केल्या.