जळगाव, 4 जुलै : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. दरम्यान, त्यांनी काल जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा माजी स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत रूपाली चाकणकर यांनी योग्य कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश दिले.
सीमा नाफडेची तक्रार नेमकी काय? –
रोहिणी खडसे यांचा माजी स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे याची पत्नी सीमा नाफडे यांनी काल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेत तक्रार दिली. याबाबत सीमा नाफडे यांनी सांगितले की, माझ्या सासरच्यांकडून मला त्रास असून माझं बाळ देखील ते सांभाळत नाहीत. माझा पती हा रोहिणी खडसे यांचा स्वीय सहायक आहे. तो एका प्रकरणातील फरार आरोपी असून त्या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी पैशांची मागणी करतो. तसेच मारझोड करत खूप त्रास देतात. माझ्या मुलीला सुद्धा वागवत नाहीत.
View this post on Instagram
दरम्यान, पैशांची मागणी जशी झाली तसे त्याला आम्ही पैसे दिले. याप्रकरणी तक्रार दाखल न करण्यासाठी मला रोहिणी खडसे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने दबाव आणत धमकी देण्यात आल्याची माहिती सीमा नाफडेने दिली. आता मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत असून आमच्या कुटुंबाला काही झाल्यास त्याला रोहिणी खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच पांडुरंग नाफडे हे जबाबदार राहतील, असे पीडित महिलेने म्हटले आहे.
रूपाली चाकणकर पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या? –
राज्य महिला आयोगाच्या महिलाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सदर बाब ही अतिशय लाजिरवाणी आणि धक्कादायक असून राजकीय व्यक्तींची गुंडशाही बंद झाली पाहिजे. खरंतर, पांडरंग नाफडेच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर मला जळगावात येऊन धक्काच बसलाय. रोहिणी खडसे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सीमा नाफडेवर तक्रार न दाखल करण्यासाठी दबाव आणला जातोय. अशापद्धतीने कोणी धमकी देत असेल तर ते अत्यंत वाईट आहे. यामुळे मी योग्य कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना सांगितलंय.
View this post on Instagram
तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत देखील पुढील दोन दिवसांत या प्रकरणाची माहिती पोहचवली जाईल. संबंधित तरूणीला देखील तक्रार दाखल करण्यास सांगितले असून जिल्हा महिला बालविकास, विधि सेवा प्राधिकरण तक्रारदार महिलेच्या पाठीशी असून पोलीस यंत्रणा देखील त्यांना संरक्षण देईल, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. दरम्यान, रोहिणी खडसे यांची अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया आलेली नाहीये.