ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 जुलै : पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत उद्या 8 जुलै रोजी शहरातील आर. ओ. तात्या व्यापारी भवनात सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. दरम्यान, सरपंच पदाच्या आरक्षणासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.
100 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची उद्या सोडत –
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार पाचोरा तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण 8 जुलै 2025 रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता कै. तात्यासाहेब आर.ओ. पाटील व्यापारी भवन, पाचोरा येथे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येईल.
त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 2 वाजता उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी आरक्षण (SC/ST/OBC व सर्वसाधारण गटातील महिला) निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, एकूण सरपंच पदांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. दरम्यान, या प्रक्रियेसाठी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व इच्छुक नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पाचोरा तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे.






