ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 नोव्हेंबर: संकटाच्या काळात गरजू कुटुंबाला मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना पाचोरा तालुक्यातील ताई देशमुख वाडी येथे समोर आली आहे. आजारी मुलाच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या निराधार मातेला पोलीस अंमलदार राहुल बेहरे (भैय्या भाऊ) यांनी स्वतःहून पुढाकार घेत आर्थिक मदत केली. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
देशमुख वाडी येथे राहणाऱ्या या माय-लेकाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुलाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईवर आहे. लोकांच्या घरी धुणीभांडी करून मिळणाऱ्या अवघ्या सहा हजार रुपयांत ती घरखर्च भागवते. त्यातच मुलाच्या आजारपणामुळे उपचारांचा खर्च पेलणे तिच्यासाठी कठीण झाले होते. मिळणारे उत्पन्न मुलाच्या उपचारांवर खर्च होत असल्याने या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.
या माय-लेकाची परिस्थिती राहुल बेहरे यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांची भेट घेतली. तसेच मुलाच्या उपचारांसाठी रोख आर्थिक मदत देत कुटुंबाला दिलासा दिला. अडचणीच्या काळात मदतीचा हात मिळाल्याने या मातेच्या संघर्षाला मोठा आधार मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकी केवळ बोलण्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जपली जाते, याचे उदाहरण बेहरे यांनी घालून दिले आहे. गरजू कुटुंबाच्या अडचणीची जाणीव ठेवून त्यांनी केलेल्या या मदतीमुळे परिसरात त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. संकटात सापडलेल्या कुटुंबाला वेळीच मिळालेली साथ हीच खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळख ठरली आहे.
हेही वाचा: आदिवासी बांधवांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी साजरी केली दीपावली






