चोपडा (जळगाव), 2 जुलै : अनेक महिलांना वाटते की, लग्नानंतर करिअर संपते आणि चूल अन् मूल याव्यतिरिक्त आयुष्यात पुढे काही भरारी घेता येत नाही. पण त्याला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एक महिला अपवाद ठरली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आडगाव येथील कल्पना कोळी यांनी लग्नानंतर पोलीस भरतीची तयारी केली. त्यानंतर प्रचंड मेहनत करत जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस परीक्षेत यश मिळवले. नुकतीच त्यांचे प्रशिक्षण संपले असून त्या जळगाव पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. यानिमित्ताने “सुवर्ण खान्देश लाईव्ह”ने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.
कल्पना कोळी यांच्याबद्दल –
लग्नानंतर सासू-सुनेचे भांडणं झाल्याची अनेक उदाहणे आपण ऐकली असतील. पण लग्नानंतर एका महिलेने तिला पोलीस दलात दाखल व्हायचे आहे, असे स्वप्न आपल्या सासू-सासरे तसेच पतीसमोर ठेवले आणि या महिलेच्या स्वप्नाला तिच्या घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. कल्पना कोळी असे या महिलेचे नाव आहे. त्याचे माहेर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आडगाव हे गाव आहे. तर लग्नानंतर त्या जळगाव शहराजवळील मोहाडी येथे राहतात. त्यांचे पती जळगाव शहरातील जैन कंपनीत कामाला आहेत. तर सासरे गोकुळ सोनवणे हे जळगावात ऑटो रिक्षा चालवतात. त्यांच्या विवाहाला 12 वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत.
लग्नानंतर त्यांनी आपल्या परिवारासमोर पोलीस व्हायचे आहे, असे सांगितल्यावर त्यांना विरोध न करता संपूर्ण परिवाराने सहकार्य केले. पोलीस भरतीच्या तयारी दरम्यान, त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांना फिजिकल ट्रेनिंगसाठी राठोड अॅकॅडमीचे राकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या प्रवासात त्यांनी कल्पना यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि अखेर या सर्वांच्या पाठबळासह जिद्दीने, मेहनतीने महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होत कल्पना यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

2017 मध्ये पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात –
2017मध्ये त्यांनी पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली होती. पण त्यांना पहिल्यांदा त्यांना यश आले नाही. यानंतर दुसऱ्या प्रयत्न करताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे यावेळीही त्यांना अपयश आले. मात्र, तरीही त्या खचल्या नाहीत आणि अखेर 2019मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्या महाराष्ट्र पोलिसात दाखल झाल्या.
हेही वाचा – अभिमानास्पद! खान्देशचे सुपूत्र बनले महाराष्ट्रातील प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य
2019मध्ये पोलीस दलात दाखल झाल्यानंतर नुकतीच त्यांचे प्रशिक्षण संपले. यानंतर प्रशिक्षण समाप्तीच्या दिवशी कल्पना कोळी यांची परेड संपल्यानंतर त्यांनी आनंदाने स्वत:च्या डोक्यावरची टोपी त्यांनी आपल्या सासऱ्यांना घालून त्यांना वंदन केले. कल्पना कोळी यांचा हा प्रवास खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक महिला, तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.
कल्पना कोळी यांचा ग्रामीण भागातील मुलींना सल्ला –
“सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना त्या म्हणाल्या की, मुली लग्नानंतर विचार करतात की, लग्न झाल्यावर संसारात गुंततो. पण जिद्ध ठेवली तर अशक्यही शक्य होऊ शकतं. तसेच लग्नानंतर सासरच्या लोकांना जर नीट समजावून सांगितलं, आपण शिकलो तर आपलं घर पुढे जाऊ शकतं, तर ते नक्की आपल्याला सहकार्य करतात. तसेच आपण ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नये. आपल्याला जे हवं, ते जिद्दीने करावं आणि आपण जे मनात ठरवतो ते निश्चित आपल्याला मिळतं, असा सल्ला पोलीस झालेल्या कल्पना कोळी या ग्रामीण भागातील तरुणींना देतात.