मुंबई, 12 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ-मोठ्या घडामोडी होत असतात. या घडामोडींमध्ये दिवसेंदिवस वाढ असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
पदावरुन मुक्त करण्याची केली होती मागणी –
गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती. मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांसमोर साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, या शब्दात जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, आज जयंत पाटील यांनी आपल्या पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात लवकरच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आपापल्या परीने पक्षबांधणी केली जात आहे. निवडणुकांसाठी नियोजन केले जात आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पक्षात बदल करण्यात आले आहेत.
कोण होणार नवीन प्रदेशाध्यक्ष –
दरम्यान, जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांच्या पक्षात प्रदेशाध्यक्षपदी कोण बसणार, याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. तसेच मंगळवारी 15 जुलै रोजी ते प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत, अशी माहिती आहे.