जळगाव, 24 जुलै : ग्रामपंचायत व सदस्य यांचेविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रांच्या नकला काढून देण्यासाठी लाच स्वीकरल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपतविभागाने कारवाई केली. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काल बुधवार 23 जुलै रोजी सायंकाळी सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर (वय 49) आणि खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल (वय 58 रा. शिवकॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघं आरोपींना अटक करण्यात आली असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या लाचप्रकरणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने 16 जून रोजी त्यांचे गावातील ग्रामपंचायत व सदस्य यांचेविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे खाते अभिलेख विभागातील सहायक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर तसेच खासगी एजंट संजय प्रभाकर दलाल यांना भेटले होते. तेव्हा त्यांनी नकला काढून देण्याच्या मोबदल्यात 2000/- रु . लाचेची मागणी केली होती.
लाचप्रकरणी दोघांना पकडले रंगेहाथ –
तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 23 जुलै रोजी तक्रार दाखल केली. दरम्यान, संजय दलाल याने “शासकीय फी व झेरॉक्सचे 1400/- रुपये व 600/- रुपये आमचे “असे म्हणून असे एकूण 2000/- रू . लाचेची मागणी केली. तसेच प्रशांत सुभाष ठाकूरने सदर रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. यावेळी लाच रक्कम स्विकारली म्हणून दोघं आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले असून सदर तपासात 880/ रू . शासकीय शुल्क व 1120/- रु. लाच रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.