पालघर, 28 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व भागातील रमाबाई अपार्टमेंट ही रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. त्यात या इमारतीचा काही भाग शेजारच्या घरांवर कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकून असल्याची माहिती आहे. दुर्घटनास्थळी एनडीआरएफचं पथक तैनात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत –
दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेली माहिती अशी की, विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. 48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 15 वर्षं जुनी होती आणि पालिकेने इमारतीला नोटीसही दिली होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.