मुंबई, 29 ऑगस्ट : राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदावर तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी ही मुदतवाढ असेल. याबाबतचे आदेश केंद्र सरकारकडून सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत.
मुख्य सचिव सुजाता सौनिक या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जून महिन्यात राज्याचे 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. यानंतर आता राज्य शासनाने त्यांना तीन महिने मुदतवाढ दिली आहे. तर मुदतवाढ देऊन राज्याची ध्येय-धोरणे पुढे राबविण्याची संधी दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
कोण आहेत राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार –
मुख्य सचिव राजेश कुमार (भाप्रसे 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे.
राजेशकुमार यांनी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.