पाचोरा, 31 ऑगस्ट : “ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्याच्याआधीही, आताही आणि भविष्यातही मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच राहणार. मात्र, ज्या ताईला पहिल्याच निवडणुकीत तात्यासाहेबांच्या प्रेमापोटी मतदारसंघातील 60 हजार लोकांनी मतदान केलं अन् 60 हजार लोकांचा विश्वासघात करून ती भाजपात गेली ही खरी गद्दारी आहे,” अशा शब्दात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाजप नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता वैशाली सुर्यवंशी यांना कधीही माफ करू शकणार नाही, या शब्दातही आमदार पाटील यांनी वैशाली सुर्यवंशी यांच्यावर निशाणा साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीचा पक्षप्रवेश तसेच निर्धार मेळावा पाचोरा शहरातील प्रसाद हॉल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
‘….तरी किशोर आप्पा डगमगणारा नाही!’ –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, वैशाली सुर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचा एक कार्यकर्ता असा दाखवा की त्यांनी वैशाली सुर्यवंशी यांच्याबरोबर प्रवेश केला. जोपर्यंत मतदारसंघातील जनता तसेच कार्यकर्ते या किशोर आप्पाच्या पाठीशी आहेत ना तर असे हजार जण जरी एकत्रित आले तरी किशोर आप्पा डगमगणारा नाही. मला 100 टक्के खात्री आहे की, मतदारसंघातील तरूण, माता-बघिनी, शेतकरी तसेच कष्टकरी या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम हा तुमचा किशोर आप्पा करत आला असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
मतदारसंघातील जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, मतदारसंघातील कोणत्याही गावाला जाऊ द्या आणि त्या गावात गेल्यानंतर 20-25 भगिनीमध्ये थेट किशोर आप्पाला घेराव टाकण्याची ताकद त्यांच्यात असते; एवढा विश्वास या किशोर आप्पाने कमावलाय. मी मतदारसंघात एवढं प्रेम कमावलंय की, काही काम असेल ते महिला भगिनी थेट किशोर आप्पाकडे येतात. आणि म्हणून एवढा विश्वास संपादन करण्यासाठी काम करावं लागतं. जनतेवर विश्वास असावा लागतो. यामुळे कोण कुठे जातंय याची मला काहीही चिंता नसल्याचे आमदार पाटील म्हणाले.
मी गेले 25 वर्ष लोकांची सेवा करतोय आणि म्हणून या मतदारसंघाने एक इतिहास करत मला सलग तिसऱ्यांदा आमदार बनवलं. यासोबतच ऐतिहासित मताधिक्य देखील मिळवून दिलं याचं श्रेय देखील लाडक्या बहिणींचं असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
वैशालीताईंच्या पक्षप्रवेशावर आमदार किशोर आप्पांनी केलं पहिल्यांदाच भाष्य –
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे तसेच दिलीप वाघ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीनंतर दिलीप वाघ यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर वैशाली सुर्यवंशी यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाष्य करत जोरदार टीका केली.