मुंबई, 6 सप्टेंबर : जगविख्यात आध्यात्मिक गुरू, कथावाचक, राष्ट्रसंत मोरारी बापू यांना स्टेट गेस्ट अर्थात राज्य अतिथीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा देण्यात यावा, अशी विनंती राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही विनंती मान्य केली असून तसा आदेशही काढण्यात आला आहे.
यवतमाळ येथे राम कथेचे आयोजन –
दरम्यान, आज शनिवारपासून यवतमाळ येथे श्रवणीय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा रामकथा यज्ञ 14 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, राज्य अतिथीच्या महाराष्ट्र सरकारच्या या आदेशानुसार, राज्यशिष्टाचारानुसार मोरारी बापू यांना त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन, वर्धा मार्गे यवतमाळ प्रवास आणि यवतमाळ येथील वास्तव्य तसेच यवतमाळ ते वर्धा मार्गे नागपूर या परतीच्या प्रवासात सरकारच्या वतीने योग्य तो सन्मान दिला जाईल. यात पोलिसांकडून मानवंदना, पायलट व एस्कॉर्ट सुविधा आणि रामकथास्थळी बंदोबस्त आदींचा समावेश आहे.
यवतमाळमध्ये दर्डा परिवारातर्फे या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळमध्ये दारव्हा मार्गावरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आज 6 सप्टेंबरपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत ही रामकथा होणार आहे. दरम्यान, आपली विनंती मान्य करून राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा दिल्याबद्दल डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
कोण आहेत मोरारी बापू –
मोरारी बापू यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी झाला. मोरारी बापू यांचे पूर्ण नाव मोरारिदास प्रभुदास हरियाणी आहे. त्यांचा जन्म गुजरातच्या महुआजवळ असलेल्या तलगाजरडा गावात झाला. मोरारी बापू यांच्या वडिलांचे नाव प्रभु दास बापू हरियाणी आणि आईचे नाव सावित्री बेन आहे. मोरारी बापू यांना 6 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. सर्व भावांमध्ये मोरारी बापू सर्वात लहान आहेत.
मोरारी बापू हे भारतीय संस्कृतीमधील अध्यात्म तसेच प्रेम, सत्य व करूणा आदी तत्त्वांचा जगभर प्रसार करत आहेत. बऱ्याच काळानंतर आजपासून त्यांच्या रसाळ रामकथेचे आयोजन विदर्भात होत आहे.