ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 15 सप्टेंबर : सातगाव डोंगरी परिसरातील जोगेश्वरी डोंगर रांगावर आज 15 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या ढगफुटीसदृश्य पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने ब्राम्हणी नदीत रौद्ररूप धारण केले. दरम्यान, ब्राम्हणी नदी लगतच्या शेतात पाण्याचा प्रवाह गेल्याने शेतपिकांबरोबरच जमिनीतील माती खरडून निघून गेली. यासोबतच सातगाव डोंगरी या गावातील नदीला लागून असलेल्या वस्तीतील 100 ते 150 घरे बाधित झाली.
सातगाव डोंगरीच्या गावातील नदीतील प्रवाह सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होता. या नदीलगतच्या घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी भरले होते. तसेच संसारपयोगी साहित्या घरकुलांचे सुरूअसलेल्या घरांमधील बांधकामाचे साहित्य आदी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, ही घटना दिवसा झाल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळलीय.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तहसीलदार विजय बनसोडे तसेच प्रशानातील अधिकारी यांच्यासोबत पुरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत सदरच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील बाधित असलेल्या प्रत्येक घरी 1 लाख रूपयांची मदत देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, तात्पुरती खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिन्याभराचे रेशन देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. यासोबतच गावातील अनेक तरूणांनी पाण्याचा प्रवाह गावात आल्यानंतर कुठलीही जीवितहानी होऊ नये, यासाठी मदतीचे प्रयत्न केले आहेत. अशा तरूणांना देखील प्रशस्तीपत्र तसेच बक्षीस देण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असेही आमदार पाटील म्हणाले.
पुराच्या पाण्याने आजूबाजूचा अनेक शेतकरी बांधवांचे तसेच घरांचे देखील नुकसान झालंय. यामुळे पंचानामा करताना पिकांच्या नुकसानीचा पंचनामा न करता थेट शेती खरडून गेल्याचा पंचनामा करा, यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळू शकते, अशा सूचना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना दिल्या.
आमदारांचे ग्रामस्थांना आश्वासन –
यावेळी सातगाव डोंगरी, गहुले, वाळी-शेवाळे आदी गावे डोंगर पायथ्याशी असल्याने दरवर्षी पुराच्या पाण्याने शेती वाहून जात असल्याची बाब शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले. याबाबत बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, गेल्या दोन वेळा पाण्याचा प्रवाहाचा हा अनुभव आलाय. सुदैवाने यामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. परंतु, भविष्यात शेताची तसेच घरांची हानी होणार नाही, याकरिता थेट डोंगरापासून गावाच्या बाहेरपर्यंत या नाल्याचे रूंदीकरण करून तसेच काँक्रेटीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्यात येतील.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बुधवारी मंत्रालयात बैठक –
पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील दुरावस्थेत तसेच धोक्याच्या पातळीत असलेल्या बंधारांच्या दुरूस्तीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बुधवार 17 सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक पार पडणार असून येत्या काळात 100 टक्के या बाबींवर तरतूद केली जाईल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना दिला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, गटविकास के.बी. अंजने, मंडळ अधिकारी जागृती चौधरी, शिवसेनेचे किशोर बारावकर, महसूल आणि पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.