जळगाव, 21 सप्टेंबर : पाझर तलावामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून उन्हाळ्यात देखील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलावातील जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मागील वर्षी निधी मंजूर अन् यंदा शंभर टक्के भरला तलाव –
मागील वर्षी या तलावाच्या दुरुस्तीकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 40 लाख रुपये निधी मंजूर केला होता. त्याचा प्रत्यक्ष परिणाम यंदा दिसून आला असून पाझर तलाव शंभर टक्के भरून गेला आहे. 26 एकर सिंचन क्षमता असलेल्या या तलावात तब्बल 120 डीसीएम पाणी साठवले गेले आहे. तसेच तालुक्यांतील लोनवाडी, विटनेर तांडा व वराड येथील पाझर तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तेथील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती अमोल पाटील कार्यकारी अभियंता सिंचन विभाग यांनी आपल्या प्रास्तविकात दिली.
सूत्रसंचालन उपअभियंता अविनाश पारधी यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा अभियंता किरण बोरसे यांनी केले. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे,वसंतवाडीचे सरपंच विनोद पाटील, उपसरपंच वंदनाताई सूर्यवंशी, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, ग्रा.पं. सदस्य अनिताताई चिमणकारे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






