ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 सप्टेंबर : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सातगाव येथील अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक आश्रमशाळेचा व्हॉलीबॉल संघ प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाला. दरम्यान, शाळेने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून जिल्ह्यात दुसऱ्या स्थान पटकावलंय. पाचोरा तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी होत या संघाने तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत अमळनेर, जामनेर आणि चोपडा तालुका संघांचा पराभव करून पाचोरा (सातगाव) संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. दरम्यान, अंतिम सामना धरणगाव विरुद्ध पाचोरा असा रंगला. चुरशीच्या या सामन्यात पाचोरा संघाने उपविजेतेपद मिळवले.
या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील विशेष उपस्थित होत्या. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षक आकाश महालपुरे आणि निखिल तडवी यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, स्थानिक शालेय समिती चेअरमन प्रा. भागवत महालपुरे यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक एफ. जी. खाटिक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधीक्षक-अधिक्षिका तसेच वस्तीगृह कर्मचारी उपस्थित होते.