ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा/मुंबई, 24 सप्टेंबर : मागील दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा तसेच भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पुराचे पाणी घरात घुसल्याने संसारपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. यासोबतच गुरे वाहून गेल्याची देखील घटना घडल्या आहेत. दरम्यान, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांची भेट घेत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
आमदारांची उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे मागणी –
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काल आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांची भेट घेतली. पाचोरा भडगाव तालुक्यात 16, 22 आणि 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री-मंत्र्यांकडे आमदार पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान –
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, माझ्या पाचोरा-भडगाव मतदार संघात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झालेला आहे. शेतात शेतक-यांना पीक ही काढायलाही जाता येत नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. मी स्वतः मतदार संघात जाऊन परिस्थितीची पाहणी करून कृषी व महसूल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या पंचनामानुसार दोन्ही तालुक्यात 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीमधील पाण्याचा निचरा होत नसून जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पीक सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेतीचे कोणतेच उत्पन्न येणार नाही असे दिसत आहे.
मागील दोन वर्षापासून दोन्ही तालुक्यांत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, त्यांना अद्यापही त्यांची भरपाई मिळालेली नाही. त्यात आत्ताच्या निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी दि. 11 संप्टेंबर 2019 च्या लागू केलेल्या निकषाप्रमाणे शासनाने मदतीसाठी काढलेल्या जिआर नुसार एनडीआरएफच्या मदतीच्या निकषाप्रमाणे 3 पट मदत दिली होती. त्याचप्रमाणे तशीच मदत माझ्या मतदार संघात मिळावी.
पाचोरा येथे दिनांक 16, सप्टेंबर 2025 (114.8 मिमी) 22 सप्टेंबर 2025 (147.8 मिमी) व 23 सप्टेंबर 2025 (139.3 मिमी) संप्टेंबर 2025 ला पाउस झाला असून तालुक्याचा सरासरी पाऊस 136.4 मिमी असून तो सरासरी पर्जन्यपेक्षा जास्त पेक्षा जास्त 257.8 मिमी पाऊस पाचोरा तालुक्यात झाला. दिनांक २३ संप्टेंबर 2025 पर्यंतचे एकूण पर्जन्याचे प्रमाण 189 टक्के आहे. यांची शासकीय नोंद उपलब्ध आहे.
तसेच भडगाव तालुक्यात दिनांक 23 संप्टेंबर 2025 रोजी पर्जन्याची सरासरी 90.70 मिमी इतकी नोंद झालेली आहे. उक्त पर्जन्याची पर्जन्यमापकानुसार शासकीय नोंद शासनाच्या एकरी उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णयानुसार माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांनाही आपण मदत द्यावी.
अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील खरीपाची पिके पूर्णपणे नष्ट झालेले आहे, त्यासोबत शेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी खचलेल्या असून, शेतातील पाईप लाईन, ठिबक, बांध, फळबागा इत्यादीचे पूर्णताः नष्ट झालेले असून, पक्के डांबरी रस्ते दिसेनासे झालेले आहे. पूल नष्ट होणे, बंधारे वाहून जाणे, दुध दुभती जनावरे बैल, गाय, बकरी, म्हैस, कोंबडी इत्यादी मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे.
तसेच काही शेतकऱ्यांकडील मळणी यंत्रणे, शेतीचे अवजारे, इत्यादी नष्ट झालेले आहे. याव्यतिरिक्त पाचोरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी घरांचे संपूर्ण संसार वाहून गेलेले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापा-यांच्या दुकानात पाणी शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. इत्यादी परिस्थितीचा सांख्ल्याने विचार करता पाचोरा-भडगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतक-यांना वरील शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून 3 पट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्राद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.