ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 ऑक्टोबर : पाचोरा तसेच भडगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच या नुकसानीची सविस्तरपणे माहिती देण्यासाठी येत्या आठ दिवसाच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात संबंधित विभागांच्या मंत्र्यांना सोबत घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देणार असून पाचोरा-भडगाव तालुक्यातील झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष बाब म्हणून निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मागील काही दिवसात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीने विकासाच्या दृष्टीकोनातून पाचोरा तालुका हा पाच वर्ष मागे गेल्याचीही खंत आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख प्रविण ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
संरक्षण भिंतीच्या निधीसाठी मागणी करणार –
पाचोरा तसेच भडगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा बसला. संबंधित गावांमध्ये भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांकडे संरक्षण भिंतीची देखील मागणी करणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. याबाबतची बैठक मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मंत्रालयात घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पाचोरा तसेच भडगाव तालुक्यातील अनेक धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक घेऊन धरणांच्या दुरूस्तीसाठी तात्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी देखील करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी विशेष जीआरची मागणी –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, ज्यावेळी अनेक गावांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्या गावांमधील नागरिकांनी आपला जीव वाचवला. सुदैवाने यामध्ये जीवित हानी टळली. मात्र, दुर्दैवाने जनावरांची मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असून साधारणतः 2400 जनावरे यामध्ये दगावले. अतिमुसळधार पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले असून जवळपास सातशे ते आठशे हेक्टर जमीन खरडून वाहून गेली असून त्याठिकाणी जमीनच अस्तित्वात नाही. खरंतर…सध्यास्थितीत शेतकरी संकटात असताना तो त्या जमिनीत कशी माती टाकेल आणि ती जमिन कशी निर्माण करू शकेल, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झालाय.
दरम्यान, शेतीची जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी विशेष बाब म्हणून जीआर काढण्याची गरज आहे. याद्वारे एखाद्या धरणातून गाळ घेऊन किमान पाच फूटापर्यंत त्याठिकाणी माती टाकून द्यावी आणि ती जमीन उभी करून द्यावी तसेच अस्तित्वात आणून द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी करणार असल्याचेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
डीपीसीतूनही निधीची मागणी –
तसेच पाचोरा आणि भडगाव तालुक्यात पावसामुळे विस्कळित झालेली घडी पुन्हा बसविण्यासाठी डीपीसीतून तात्काळ निधी देण्याची गरज आहे. डीपीसीतील मदतीबाबतचे नियम-अटी बाजूला ठेऊन माझ्या मतदारसंघासाठी विशेष बाब जास्तीचा निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांना केलं महत्वाचं आवाहन –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य विभागाने तसेच खासगी डॉक्टरांनी वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे. तसेच शासनाच्या आरोग्यसंदर्भात असलेल्या योजनांचा लाभ घेऊन सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य देण्यासाठी पाचोरा-भडगाव तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी एक पाऊल पुढे येऊन जनतेची सेवा करावी, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.