पणजी (गोवा), 4 ऑक्टोबर : गोवा हौसिंग अँड रिजनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GHRDC) ने आपल्या कर्मचाऱ्यांचे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मेधावी स्किल्स युनिव्हर्सिटी आणि बीव्हीजी स्किल्स अकॅडमी यांच्या माध्यमातून ‘रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग – शॉर्ट टर्म ट्रेनिंग’ (RPL-STT) फ्रेमवर्क अंतर्गत राबविण्यात येत आहे. अल्पावधीत कर्मचारी शिक्षण व कौशल्य वृद्धी साध्य करू शकतील.
या योजनेत, आठवीपर्यंत उत्तीर्ण किंवा अपयशी ठरलेले कर्मचारी केवळ ३ ते ४ महिन्यांत ऑनलाइन मूल्यांकन पूर्ण करून स्किल लेव्हल ३.५ पर्यंत पोहोचू शकतात. यशस्वी उमेदवारांना दहावी व बारावी समकक्ष प्रमाणपत्र मिळणार असून ते पुढे डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच सेवेत उत्तम बढतीच्या संधींसाठी पात्र ठरणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, “गोवा सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी कटिबद्ध आहे. या उपक्रमामुळे शिक्षण व कौशल्य वृद्धीची नवी दारे खुली होतील.”देशात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत असल्याने, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण सबलीकरणाच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे.
ही सामंजस्य करारपत्रे (MoU) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत GHRDC चे व्यवस्थापकीय संचालक गुरुप्रसाद देसाई, मेधावी स्किल्स युनिव्हर्सिटीचे मोहसिन तहसीलदार व बीव्हीजी स्किल्स अकॅडमीचे रवी घाटे यांनी स्वाक्षरी करून केली.