ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 ऑक्टोबर : दरवर्षी प्रमाणे यंदाही पाचोरा तालुक्यातील सामनेर या गावी कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने आज रंभाई मातेच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी रंभाई मातेच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी यात्रेची तयारी केली आहे.
काय आहे नेमकी आख्यायिका –
रंभाई देवी या पवार घराण्याच्या कन्या आणि सामनेर येथील चव्हाण कुलातील सून होत्या. त्यांचे माहेर नानखुर्द (ता. एरंडोल) येथे होते. दाम्पत्याला संतती होत नसेल, एखाद्याच्या दुर्धर आजारांवर उपचार करूनही बरा न झाल्यास लोक रंभाई देवीची भक्ती करायचे. देवीचा हा महिमा सर्वत्र पसरल्याने येथील दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर कोजागिरी पौर्णिमेला या यात्रोत्सवाचे आयोजन होण्यास सुरुवात झाली.
कोण आहे यंदाचे मानकरी –
यंदा सामनेर येथील रंभाई देवी यात्रोत्सवाचे मानकरी कौतिक चव्हाण, गंगाराम चव्हाण, संतोष चव्हाण, धनराज चव्हाण, भीमराज चव्हाण, प्रमोद चव्हाण, नरेंद्र चव्हाण, श्रीकांत चव्हाण, योगेश चव्हाण, अतुल चव्हाण हे आहेत.