पाचोरा, 22 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असताना पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय. राज्यात भाजप तसेच शिंदेची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये महायुती आहे. मात्र, स्थानिक राजकीय समीकरणांमुळे पाचोऱ्यात महायुतीत फूट पडण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
आमदार किशोर आप्पा पाटील यांची स्वबळाची भूमिका –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ही स्वबळावर लढणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ठ केलंय. यावरून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार किशोर आप्पा यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारे खुली असल्याचे सांगितले होते. यावरून भाजपचे जरी चर्चेसाठी दारे खुली असली तरी शिवसेनेची दारे बंद झाली असल्याचे वक्तव्य आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलं होतं. यावरून पाचोऱ्यात शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार हे स्पष्ठ झालंय. तर दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्यात भाजपची भूमिका स्पष्ठ केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ठ केली भाजपची भूमिका –
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हस्ते आज दुपारी पाचोऱ्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघासाठी भाजपची भूमिका स्पष्ठ केली.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील आमचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या जाणार असल्याचे सांगितले आहे. जिथे फारच अडचण असेल किंवा तडजोड होत नसेल त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढू असे यापूर्वी आमच्या नेत्यांनी जाहीर केलंय. यानुसार, पाचोऱ्यात आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत होते.
मात्र, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी युती करणार नसून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे आधीच सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला आता पाचोऱ्यात भाजप म्हणून स्वतंत्र लढावे लागणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ठ केले. त्यानुसार आम्ही तयारी केली असून आम्ही आता कामाला लागलेले आहोत, असेही मंत्री महाजन म्हणाले.
हेही वाचा : माजी आमदार राजीव देशमुखांना शेवटचा निरोप; हजारोंच्या उपस्थितीत चाळीसगावात अंत्यसंस्कार






