यावल, 28 ऑक्टोबर : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हेच खरी सेवा आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीने आर्थिक पारदर्शकतेसह प्रगतीचा आदर्श निर्माण केला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या मेहनतीचे पैसे डुबवले, तर गाठ माझ्याशी आहे,” असा स्पष्ट इशारा आमदार अमोल जावळे यांनी दिला.
यावल येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नव्या विकासकामांचा शुभारंभ आमदार जावळे यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. या विकासकामांमध्ये सुमारे पाच हजार चौरस फुटांचे बाजार ऑट, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी जलकुंभ तसेच अन्य मूलभूत सोयींच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण अंदाजे चाळीस लाख रुपयांचा खर्च या प्रकल्पांवर होणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही कामे अखेर प्रत्यक्षात उतरली आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे होते, त्यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ राज्य सदस्य हिरालाल चौधरी, माजी सभापती नारायण चौधरी, माजी सभापती हर्षद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील व प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, परसाडे सरपंच मीना तडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुकाध्यक्ष सागर कोळी, फैजपूर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेन्सिंग राजपूत, माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेना (शिंदे गट) नेते तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : इंजिनिअर ते अभिनेता..अन् अचानक शेवट; पारोळ्याच्या सचिन चांदवडेचा टोकाचा निर्णय






