जळगाव, 10 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली. मात्र, जळगाव जिल्ह्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात पाचोरा-भडगाव वगळता कुठे युती होणार याबाबत अजूनही स्पष्ठता नाहीये. मात्र, जळगावचे पालकमंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील युतीबाबत भाष्य केलंय.
मंत्री गुलाबराव पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी युती होतेय तर काही ठिकाणी होत नाहीये. यामुळे जळगाव जिल्ह्यात युतीबाबत संमिश्र चित्र दिसून येत आहे. तरी 18 नगरपालिकांपैकी 6 ते 7 ठिकाणी युती तसेच महायुती होईल. एरंडोल, पारोळा, धरणगाव, नशिराबाद, मुक्ताईनगर, सावदा याठिकाणी प्राथमिक चर्चेनुसार युती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी युती होणार नसल्याचे चित्र आहे.
View this post on Instagram
पाचोऱ्यातील युती-आघाडीबाबतचे चित्र स्पष्ठ –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वप्रथम शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला. यानंतर भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी देखील पक्षाची भूमिका स्पष्ठ करत स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि भाजप यांच्याविरोधात जोरदार लढत देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पाचोऱ्यात शिवसेना, भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
पारोळ्यात उद्या पत्रकार परिषद –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पारोळ्यात उद्या भाजप आणि शिवसेना यांची उद्या दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांची या पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एरंडोल-पारोळा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती म्हणून लढणार का?, याबाबचे चित्र स्पष्ठ होण्याची शक्यता आहे.






