पारोळा, 11 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्यात आज दुपारी भाजप शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत निर्णय घेण्यात आला असून पारोळा नगरपरिषदेचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचा तर एरंडोल नगरपरिषदेचा उमेदवार हा भाजपचाच राहणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलीय.
आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले? –
आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, पारोळा-एरंडोल मतदारसंघातील नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये युतीबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, पारोळा नगरपरिषदेचा उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेचा तर एरंडोल नगरपरिषदेचा उमेदवार हा भाजपचाच राहणार आहे. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अमळनेर, धरणगाव, नशिराबाद तसेच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी युतीची शक्यता आहे. ज्याठिकाणी युतीचे प्रस्ताव असतील, स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत असेल त्याठिकाणी युती होईल, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ठ केले.
भाजप-शिवसेनेच्या युतीत राष्ट्रवादीचा समावेश नाही? –
पारोळा-एरंडोलमध्ये भाजप-शिवसेनाचा युतीचा निर्णय झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांचा समावेशाबाबत अद्याप स्पष्ठता नाहीये. दरम्यान, पारोळ्यात भाजप-शिवसेना युतीबाबत ठरलंय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये. जर त्यांचा प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार करू, अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.






