ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 15 नोव्हेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांच्याकडे सुचेताताई वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पाचोऱ्यात भाजपची रॅली –
पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सुचेताताई वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यानिमित्त भाजपकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीची पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथील पंचमुखी हनुमान चौकातून ढोल ताशांच्या गजरात सुरूवात झाली. यानंतर गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपरिषद कार्यालय चौकपर्यंत ही रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी भाजपचे जळगाव जिल्हा अध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप नेते दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी, डॉ. डी.एम. पाटील, प्रताप पाटील, मधूकर काटे, भूषण वाघ, नंदू सोमवंशी, दीपक माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ यांच्यात थेट लढत –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पत्नी सुनिताताई पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले असून त्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वबळाची घोषणा केली असल्याने पाचोरा आणि भडगावध्ये त्यांच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून नगराध्यपदासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेताताई वाघ यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सुनिताताई पाटील विरूद्ध सुचेताताई वाघ अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्यास्थितीत दिसून येत आहे.
हेही वाचा : नगरपरिषद निवडणूक 2025: ‘इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना अडचणी’ राज्य निवडणूक आयोगाचा तातडीचा मोठा निर्णय






