ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 नोव्हेंबर : पाचोरा-भडगावची जनता ही कायम माझ्या पाठीशी आहे. पाचोऱ्यात झालेल्या विकासाला साथ देत पाचोरा शहराची जनता ही जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल आणि शिवसेनेचे 28 नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला. पाचोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सुनिताताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून रॅली काढण्यात आली. यानिमित्त माध्यमांसोबत आमदार किशोर आप्पा पाटील बोलत होते.
“पाचोऱ्यातील रॅलीला अभूतपर्व प्रतिसाद मिळाला” –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पाचोरा शहर तसेच तालुक्यातील जनतेचे विचार घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय योग्य आहे. कारण, उमेदवारी अर्ज दाखल करण्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला मिळालेला अभूतपर्व प्रतिसाद तसेच पाचोऱ्यातील जनतेने आमचे जल्लोष्षात केलेले स्वागत हे त्याचे द्योतक असल्याचेही आमदार पाटील म्हणाले. पाचोरा शहरात वारकरी भवन, तालुका क्रीडा संकुल, राम मंदिर परिसर विकास, उपजिल्हा रूग्णालय तसेच नगरविकास योजना, इ. विकासकामे सुरू असून पाचोरा शहराच्या विकासासाठी मी कटीबद्ध असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
पाचोऱ्याच्या पाणी प्रश्नावर काय म्हणाले? –
पाचोरा शहरातील पाणी प्रश्नावरून विरोधकांकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, पाचोरा शहरातील पाणी पुरवठा योजना 2007 मध्ये मंजूर झाली. त्यावेळी शहरातील लोकसंख्येनुसार ती मंजूर झाली होती. यानंतर तब्बल 2017 मध्ये ती योजनेचे काम सुरू झाले. मात्र, मागील दहा वर्षांच्या तुलनेत 2017 मध्ये लोकसंख्या वाढली.
पाचोरा शहरातील पाणी प्रश्न लक्षात घेत 60 करोड रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या सहा महिन्यांच्या आत आठवड्यात एक/दोन दिवसांच्या आड पाणी यायला कुठलीही अडचण येणार नाही. यासोबतच वाघूर धरण आणि गिरणा धरणावरून पाईपलाईन आणण्यासाठी डीपीआर करण्यात आला होता.
मात्र, वाघूर धरणावरून पाण्याचा पुरवठा नैसर्गिकरित्या होई शकणार नसल्याने गिरणा धरणावरून पाणी आणण्याचे निश्चित करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येत आहे. मला खात्री आहे की, येत्या वर्षभराच्या आत 350 कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन पाचोरा शहरातील जनतेला 24*7 स्वच्छ आणि सुंदर पाणी मिळेल, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
“मी एक कुस्तीपटू, म्हणून…!”
मी कॉलेजमध्ये असताना कुस्तीपटू होतो. यामुळे मी कुस्तीपटू असल्याने कोणावर कोणता डाव टाकायचा याबाबत मला पुर्णपणे कल्पना आहे. हे कितीही मल्ल (विरोधक) एकत्र आले तर यांना पाचोऱ्यातील जनतेच्या आशीर्वादाने यांना धोबीपछाड करेल, अशी मला 100 टक्के खात्री असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. आमदार मंगेश चव्हाण यांना पाचोऱ्यातील जनता जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.






