ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 डिसेंबर : राज्यातील नगरपरिषद तसेच नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून काल 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र, हे मतदान पार पडत असताना 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या पार्श्वभूमीवर तब्बल 18 दिवसांनी निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे मतपेट्यांमध्ये घोळ होण्याचा मतदार तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तातडीची आज दुपारी पाचोऱ्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे.
“….तर मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही लावणार!” –
मतमोजणी पुढे ढकलण्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल आणि आनंदाचा उत्साह साजरा करता येईल, अशा भावना उमेदवार तसेच कार्यकर्त्यांमध्ये होत्या. मात्र, मतमोजणी पुढे ढकलली गेली आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तसेच तब्बल 20 दिवस मतमोजणीचा कार्यकाळ लांबल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मतपेटींमध्ये घोळ होण्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, कुठल्याही मतपेटीत फेरफारची घटना घडणार नाही, अशी खात्री मी पाचोरा-भडगावमधील मतदार तसेच कार्यकर्त्यांना देतो.
दरम्यान, मतपेट्यांमध्ये घोळ होईल, असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी मतमोजणी केंद्रावर सुरक्षा रक्षक ठेऊ शकतात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या समाधानासाठी मी स्वतंत्ररित्या दोघंही मतमोजणी केंद्रावर सुरक्षा रक्षक नेमणार आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास पाचोरा-भडगाव येथील दोघंही मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही लावणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
पाचोरा-भडगावमध्ये शिवसेनाचा ऐतिहासिक विजय होणार –
आमदार किशोर आप्पा पुढे बोलताना म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आज मी पाचोरा आणि भडगावमधील शिवसेना नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांसोबत बैठक घेत मतदानाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी उमेवारांनी मतदानाची संपुर्ण परिस्थिती सांगत आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. त्यानुसार, पाचोऱ्यात एक नगराध्यक्ष तसेच 26 नगरसेवक पदासाठी ज्या उमेदवारांची निवडणूक झालीय त्यामध्ये पाचोऱ्याच्या इतिहासात एवढे नगरसेवक कधीही निवडून आले नाही तेवढे नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील, अशा पद्धतीची ऐतिहासिक निकाल 21 डिसेंबर रोजी लागेल.
तसेच पाचोऱ्यात शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला किमान 15 हजाराएवढे मताधिक्य मिळेल आणि सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून येतील, असे चित्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी केलेल्या कथनावरून तसेच जनतेच्या चेहऱ्यावरून मला वाटते. यासोबतच मी केलेल्या बूथ पाहणीनुसार, पाचोऱ्यातील 28 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष तसेच भडगावमधील 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हे ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केलाय.
मतदार तसेच कार्यकर्त्यांचे मानले आभार –
लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा अधिकार मोठ्या प्रमाणात मतदारांनी बजावल्यामुळे पाचोरा-भडगाव शहरवासियांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आभार मानले. तसेच पाचोरा-भडगावमध्ये शांतातपुर्ण मतदान पार पाडल्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे देखील आभार आमदार पाटील यांनी मानले.






