चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर, 8 डिसेंबर : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आज पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती करण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात तालिका सभापतींची नावे जाहीर केली.
यामध्ये तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली –
विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्य श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि दिवंगत सदस्य प्रकाश केशवराव देवळे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.






