जळगाव, 15 डिसेंबर : शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 दिनांक 16 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार आहेत. या स्पर्धांसाठी जळगाव शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून सुमारे तीन हजार खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत.
उद्यापासून होणार क्रीडा स्पर्धेस सुरूवात –
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मंगळवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री (युवा कल्याण व क्रीडा) श्रीमती रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा बुधवारी होणार समारोप –
स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवार, 18 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त, आदिवासी विकास विभाग श्रीमती लीना बनसोडे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांमध्ये नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत.
या विभागीय स्पर्धांमधून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीव, संघभावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे, तसेच क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.






